बंगलोर मध्ये शाळांना दसऱ्याच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे यावर्षी दसऱ्याच्या सुट्टीत साऊथ इंडिया ट्रिप करायचे ठरवले. KSTDC चे बंगलोरहून टूर असतात त्यांची बेस्ट ऑफ साऊथ इंडिया ही ८ दिवसांची टूर ठरवली.
पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता बंगलोरहून निघालो. तामिळनाडू मधील तिरुवन्नमलै येथील अरुणाचलेश्वर दर्शन घेतले. त्यानंतर चिदंबरम येथील नटराज व तिरुनल्लार येथे शनेश्वर दर्शन घेतले.
दुसऱ्या दिवशी तंजावर, कुंभकोणम आणि श्रीरंगमला गेलो. तंजावरचे हजारो वर्षे जुने दगडी देऊळ बघण्यासारखे आहे.
तिसऱ्या दिवशी सकाळी ५ ला मदुराईला मीनाक्षी देवीचे दर्शन घेतले. तिथे नवरात्रीनिमित्त फुलांची अतिशय सुंदर सजावट केली होती. नंतर रामेश्वरमला पोचलो. तिथे समुद्र स्नान व २१ कुंड स्नान केले. बसने धनुष्कोडीला पण गेलो तिथे रामसेतू पाहिला. संध्याकाळी कन्याकुमारीला पोचलो.
चौथ्या दिवशी ढगाळ हवेमुळे कन्याकुमारीला सूर्योदय व सूर्यास्त पाहता आला नाही. पण बोटींमधून विवेकानंद स्मारक पाहायला गेलो. तिथे अतिशय सुंदर देऊळ व ध्यान मंडप आहे. ३ समुद्र एकत्र येतात त्यांचे पाणी वेगळ्या वेगळ्या रंगांचे दिसते. भारताच्या दक्षिण टोकावर उभे राहणे अतिशय रोमांचकारी वाटत होते.
पाचव्या दिवशी सुचिंद्रम येथील दत्त मंदिर पहिले. हे देऊळ पण अतिशय सुंदर होते. मग कोवालम बीच वर थोडा वेळ घालवून रात्री त्रिवेंद्रमला पोचलो. तिथे अनंत पद्मनाभ दर्शन घेतले.
सहाव्या दिवशी कालडी येथे श्री शंकराचार्य यांचे जन्मस्थान पाहिले. योगायोग असा की १० वर्षांपूर्वी लग्नानंतर मुन्नारला हनिमूनला आलो तेंव्हा आम्ही येथे आलो होतो. आज परत तिथेच येणे झाले. तिथून गुरुवायुरला विष्णूचे दर्शन घेतले.
सातव्या दिवशी पळनी येथे डोंगरावर ३०० पायऱ्या चढून कार्तिकेय स्वामीचे दर्शन घेतले. खाली येताना रोपवेने आलो. तिथून कोडाई कॅनालला जायला निघालो. घाट रस्ता सुंदर होता. तिथे पोचल्यावर चांगलीच थंडी होती.
आठव्या दिवशी तिथे ब्रायंट पार्क, पिलर रॉक वगैरे ठिकाणे पहिली. जर्मनीमध्ये जी फुले होती तशीच फुले इथेपण दिसली. इथे चॉकोलेटपण छान मिळाले. संध्याकाळी बंगलोरला यायला परत निघालो.
नवव्या दिवशी सकाळी ५ ला बंगलोरला पोचलो. अशाप्रकारे आमची ट्रिप खूप छान झाली. ८ दिवसात पूर्ण दक्षिण भारत बघून झाला.











