Thursday, 2 November 2023

दक्षिण भारत सहल

 बंगलोर मध्ये शाळांना दसऱ्याच्या सुट्ट्या असतात. त्यामुळे यावर्षी दसऱ्याच्या सुट्टीत साऊथ इंडिया ट्रिप करायचे ठरवले. KSTDC चे बंगलोरहून टूर असतात त्यांची बेस्ट ऑफ साऊथ इंडिया ही ८ दिवसांची टूर ठरवली. 


पहिल्या दिवशी सकाळी ६ वाजता बंगलोरहून निघालो. तामिळनाडू मधील तिरुवन्नमलै येथील अरुणाचलेश्वर दर्शन घेतले. त्यानंतर चिदंबरम येथील नटराज व तिरुनल्लार येथे शनेश्वर दर्शन घेतले. 


दुसऱ्या दिवशी तंजावर, कुंभकोणम आणि श्रीरंगमला गेलो. तंजावरचे हजारो वर्षे जुने दगडी देऊळ बघण्यासारखे आहे. 


तिसऱ्या दिवशी सकाळी ५ ला मदुराईला मीनाक्षी देवीचे दर्शन घेतले. तिथे नवरात्रीनिमित्त फुलांची अतिशय सुंदर सजावट केली होती. नंतर रामेश्वरमला पोचलो. तिथे समुद्र स्नान व २१ कुंड स्नान केले. बसने धनुष्कोडीला पण गेलो तिथे रामसेतू पाहिला. संध्याकाळी कन्याकुमारीला पोचलो. 


चौथ्या दिवशी ढगाळ हवेमुळे कन्याकुमारीला सूर्योदय व सूर्यास्त पाहता आला नाही. पण बोटींमधून विवेकानंद स्मारक पाहायला गेलो. तिथे अतिशय सुंदर देऊळ व ध्यान मंडप आहे. ३ समुद्र एकत्र येतात त्यांचे पाणी वेगळ्या वेगळ्या रंगांचे दिसते. भारताच्या दक्षिण टोकावर उभे राहणे अतिशय रोमांचकारी वाटत होते. 


पाचव्या दिवशी सुचिंद्रम येथील दत्त मंदिर पहिले. हे देऊळ पण अतिशय सुंदर होते. मग कोवालम बीच वर थोडा वेळ घालवून रात्री त्रिवेंद्रमला पोचलो. तिथे अनंत पद्मनाभ दर्शन घेतले. 


सहाव्या दिवशी कालडी येथे श्री शंकराचार्य यांचे जन्मस्थान पाहिले. योगायोग असा की १० वर्षांपूर्वी लग्नानंतर मुन्नारला हनिमूनला आलो तेंव्हा आम्ही येथे आलो होतो. आज परत तिथेच येणे झाले. तिथून गुरुवायुरला विष्णूचे दर्शन घेतले. 


सातव्या दिवशी पळनी येथे डोंगरावर ३०० पायऱ्या चढून कार्तिकेय स्वामीचे दर्शन घेतले. खाली येताना रोपवेने आलो. तिथून कोडाई कॅनालला जायला निघालो. घाट रस्ता सुंदर होता. तिथे पोचल्यावर चांगलीच थंडी होती.


आठव्या दिवशी तिथे ब्रायंट पार्क, पिलर रॉक वगैरे ठिकाणे पहिली. जर्मनीमध्ये जी फुले होती तशीच फुले इथेपण दिसली. इथे चॉकोलेटपण छान मिळाले. संध्याकाळी बंगलोरला यायला परत निघालो. 


नवव्या दिवशी सकाळी ५ ला बंगलोरला पोचलो. अशाप्रकारे आमची ट्रिप खूप छान झाली. ८ दिवसात पूर्ण दक्षिण भारत बघून झाला.  














Thursday, 13 July 2023

बंगलोरचे दिवस NAL colony

 



२ एप्रिल २०२२ ते १४ मे २०२३ असे १ वर्ष पुण्यात राहिलो. १५ मे २०२३ ला बंगलोर मध्ये शिफ्ट आलो. NAL कॉलनी मध्ये घर मिळाले होते. २ बेडरूम घर व पहिला मजला होता. कॉलनी मध्ये खूप झाडे होती. जणू काही जंगलात राहतो आहोत असे वाटे. हवामान पण खूपच थंड आणि जर्मनीसारखे होते. आंबे, फणस, आवळे, फुलझाडे होती. आधी १ महिना घरात सगळ्या सोयी करून घेण्यात गेला. नवीन फर्निचर घेतले. आद्याला कॉलनीच्या शाळेत ऍडमिशन मिळाली. अनंतला रविशंकर स्कूलला ऍडमिशन मिळाली. तो रोज स्कूल बसने जात असे. मला रोज ५.३० ला उठावे लागे व अनंत ६.३० ला उठत असे. इडली, डोसे, मेदूवडे वगैरे उत्तम मिळत असे. कॉलनी मध्ये डास खूप होते. फिरायला छान रस्ते, ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट वगैरे होते. ऑफिस पण कॉलनी मधेच होते.  

कॉलनी मध्ये शेजारी खूप चांगले होते. माझी एक तेलगू मैत्रीण खूपच चांगली होती तिने मला प्रेमाने जेवायला बोलावले होते. कन्नड मैत्रीण अनंतला अभ्यासात मदत करीत असे. आद्याची छोटी मल्याळम मैत्रीण सेरा पण खूप चांगली होती. दिल्ली ची मैत्रीण पूजा आणि तिची मुले पण खूप छान होते. आम्ही सगळे मिळून मुलांचे वाढदिवस, हनुमान चालीसा पठण, सुंदरकांड पठण असे कार्यक्रम करत असू. मुले शनिवारी बालभारतीला जात असत. कॉलनी मध्ये नॉर्थ इंडियन लोकांबरोबर खेळलेली होळी पण लक्षात राहील. मी मुलांबरोबर क्रिकेट बॅडमिंटन खेळत असे. मुलांना चिल्ड्रेन पार्कला घेऊन जात असे. मुलांना खेळायला खूप मुले होती. 

पण कॉलनी कितीही चांगली असली तरी घर जुने होते व फार सोयी नव्हत्या. त्यामुळे आम्ही एका वर्षात बाहेर घर घेतले व २९ मार्च २०२४ रोजी नवीन घरी शिफ्ट झालो.  

नवीन घर ३ बेडरूमचे व खूपच छान होते. त्याच्या आठवणी पुढील लेखात.. 

Wednesday, 4 January 2023

जर्मनी कायमचे सोडून भारतात पुनरागमन

                        

माझ्या बालपणीची पहिले १८ वर्षे कर्जतमध्ये, पुढची ८ वर्षे मुंबईमध्ये, पुढची ९ वर्षे जर्मनीमध्ये गेली. २० मे २०१३ ला मी पहिल्यांदा जर्मनीमध्ये पाऊल टाकले आणि १ एप्रिल २०२२, या दिवशी आम्ही जर्मनीतून भारतात कायमचे परत येण्यासाठी विमानात बसलो. जेंव्हा वन वे तिकीट काढले तेंव्हाच मनाला हुरहूर लागली होती की आता बहुतेक परत जर्मनीमध्ये येणे नाही. डोळ्यासमोर गेल्या ९ वर्षातल्या सर्व आठवणी सरकू लागल्या.


आल्यावर पहिले जॉब बघायला सुरुवात केली. जेंव्हा समजले की जर्मन भाषेमुळे जॉब मिळणे खूप कठीण आहे आणि भारतातली पदवी तिथे चालणार नाही तेंव्हा खूप वाईट वाटले. तेवढ्यात पहिल्या बाळाची चाहूल लागली आणि आनंद झाला. मग बाळाचा जन्म, त्याचे मोठे होणे यात वेळ जाऊ लागला. बाळाला पूर्ण दिवस बाहेर ठेवून जॉब करणे जिवावर येत होते. अनंत ३ वर्षांचा झाला मग दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. आद्याचा जन्म झाला. मुलांचे  किंडरगार्डेन, शाळा यात मजेत वेळ जात होता.

निसर्ग उन्हाळ्यात खूप सुंदर असे, फिरायला फार मजा येई. थंडी मध्ये नकोसे वाटे. स्वच्छ हवा, शांतता हे सर्व हवेसे वाटे. पण शेजार्यांचे वाईट अनुभवसुद्धा आले. मुलांनी आवाज केला तरी तक्रार करायचे. लोकांमध्ये आपलेपणा वाटत नसे. जर्मन भाषा चांगली येऊ लागली तरी पूर्ण आत्मसात होणे कठीण वाटे. अनंत ला पण शाळेत जर्मन थोडे कठीण वाटे. घरी मराठी बोलणे, भारतीय संस्कृती आणि बाहेर जर्मन संस्कृती यांचा मेळ बसत नाही असे वाटत होते. पुढे जाऊन मुलांना या देशात, या संस्कृतीमध्ये मिसळणे कठीण जाईल असे आम्हाला वाटले. त्यामुळे भारतात यायचा निर्णय पक्का झाला. भारतात आलो तेंव्हा ट्रॅफिकचे आवाज, प्रदूषण, गर्दी, हे सर्व नकोसे वाटले. पण आपली भाषा, आपले खाद्यपदार्थ, सण, लोकांमधील आपुलकी हे सर्व हवेहवेसे वाटते. मुलांना इंग्लिश शाळा खूप सोपी वाटते. आपल्यालाही अभ्यास घेणे सोपे जाते.

शेवटी कितीही म्हटले तरी जुन्या आठवणी विसरता येत नाहीत. तुलना केली तर परत आलो त्याची हळहळ वाटत राहते. पण परत येऊन जर्मनीमधील जे काही गमावले त्याबदल्यात भारतात बरेच काही मिळाले. त्यामुळे तुलना न करणे आणि पुढील आयुष्य आनंदात घालवणे हेच उत्तम. कारण एका जागी सर्व काही मिळू शकत नाही. जर्मनीमधील ९ वर्षे माझ्यासाठी अविस्मरणीय होती. पण पुढचा विचार करता सध्या तरी भारतात परत आलो ते बरे झाले असे वाटते. शेवटी काळच ठरवेल की आमचा निर्णय योग्य होता की नाही.