माझ्या बालपणीची पहिले १८ वर्षे कर्जतमध्ये, पुढची ८ वर्षे मुंबईमध्ये, पुढची ९ वर्षे जर्मनीमध्ये गेली.
२० मे २०१३ ला मी पहिल्यांदा जर्मनीमध्ये पाऊल टाकले आणि १ एप्रिल २०२२, या
दिवशी आम्ही जर्मनीतून भारतात कायमचे परत येण्यासाठी विमानात बसलो.
जेंव्हा वन वे तिकीट काढले तेंव्हाच मनाला हुरहूर लागली होती की आता बहुतेक
परत जर्मनीमध्ये येणे नाही. डोळ्यासमोर गेल्या ९ वर्षातल्या सर्व आठवणी
सरकू लागल्या.
आल्यावर पहिले जॉब बघायला
सुरुवात केली. जेंव्हा समजले की जर्मन भाषेमुळे जॉब मिळणे खूप कठीण आहे आणि
भारतातली पदवी तिथे चालणार नाही तेंव्हा खूप वाईट वाटले. तेवढ्यात पहिल्या
बाळाची चाहूल लागली आणि आनंद झाला. मग बाळाचा जन्म, त्याचे मोठे होणे यात
वेळ जाऊ लागला. बाळाला पूर्ण दिवस बाहेर ठेवून जॉब करणे जिवावर येत होते.
अनंत ३ वर्षांचा झाला मग दुसऱ्या बाळाची चाहूल लागली. आद्याचा जन्म झाला.
मुलांचे किंडरगार्डेन, शाळा यात मजेत वेळ जात होता.
निसर्ग
उन्हाळ्यात खूप सुंदर असे, फिरायला फार मजा येई. थंडी मध्ये नकोसे वाटे.
स्वच्छ हवा, शांतता हे सर्व हवेसे वाटे. पण शेजार्यांचे वाईट अनुभवसुद्धा
आले. मुलांनी आवाज केला तरी तक्रार करायचे. लोकांमध्ये आपलेपणा वाटत नसे.
जर्मन भाषा चांगली येऊ लागली तरी पूर्ण आत्मसात होणे कठीण वाटे. अनंत ला पण
शाळेत जर्मन थोडे कठीण वाटे. घरी मराठी बोलणे, भारतीय संस्कृती आणि बाहेर
जर्मन संस्कृती यांचा मेळ बसत नाही असे वाटत होते. पुढे जाऊन मुलांना या
देशात, या संस्कृतीमध्ये मिसळणे कठीण जाईल असे आम्हाला वाटले. त्यामुळे
भारतात यायचा निर्णय पक्का झाला. भारतात आलो तेंव्हा ट्रॅफिकचे आवाज,
प्रदूषण, गर्दी, हे सर्व नकोसे वाटले. पण आपली भाषा, आपले खाद्यपदार्थ, सण,
लोकांमधील आपुलकी हे सर्व हवेहवेसे वाटते. मुलांना इंग्लिश शाळा खूप सोपी
वाटते. आपल्यालाही अभ्यास घेणे सोपे जाते.
शेवटी
कितीही म्हटले तरी जुन्या आठवणी विसरता येत नाहीत. तुलना केली तर परत आलो
त्याची हळहळ वाटत राहते. पण परत येऊन जर्मनीमधील जे काही गमावले
त्याबदल्यात भारतात बरेच काही मिळाले. त्यामुळे तुलना न करणे आणि पुढील
आयुष्य आनंदात घालवणे हेच उत्तम. कारण एका जागी सर्व काही मिळू शकत नाही.
जर्मनीमधील ९ वर्षे माझ्यासाठी अविस्मरणीय होती. पण पुढचा विचार करता सध्या
तरी भारतात परत आलो ते बरे झाले असे वाटते. शेवटी काळच ठरवेल की आमचा
निर्णय योग्य होता की नाही.
No comments:
Post a Comment