२ एप्रिल २०२२ ते १४ मे २०२३ असे १ वर्ष पुण्यात राहिलो. १५ मे २०२३ ला बंगलोर मध्ये शिफ्ट आलो. NAL कॉलनी मध्ये घर मिळाले होते. २ बेडरूम घर व पहिला मजला होता. कॉलनी मध्ये खूप झाडे होती. जणू काही जंगलात राहतो आहोत असे वाटे. हवामान पण खूपच थंड आणि जर्मनीसारखे होते. आंबे, फणस, आवळे, फुलझाडे होती. आधी १ महिना घरात सगळ्या सोयी करून घेण्यात गेला. नवीन फर्निचर घेतले. आद्याला कॉलनीच्या शाळेत ऍडमिशन मिळाली. अनंतला रविशंकर स्कूलला ऍडमिशन मिळाली. तो रोज स्कूल बसने जात असे. मला रोज ५.३० ला उठावे लागे व अनंत ६.३० ला उठत असे. इडली, डोसे, मेदूवडे वगैरे उत्तम मिळत असे. कॉलनी मध्ये डास खूप होते. फिरायला छान रस्ते, ग्राउंड, बॅडमिंटन कोर्ट वगैरे होते. ऑफिस पण कॉलनी मधेच होते.
कॉलनी मध्ये शेजारी खूप चांगले होते. माझी एक तेलगू मैत्रीण खूपच चांगली होती तिने मला प्रेमाने जेवायला बोलावले होते. कन्नड मैत्रीण अनंतला अभ्यासात मदत करीत असे. आद्याची छोटी मल्याळम मैत्रीण सेरा पण खूप चांगली होती. दिल्ली ची मैत्रीण पूजा आणि तिची मुले पण खूप छान होते. आम्ही सगळे मिळून मुलांचे वाढदिवस, हनुमान चालीसा पठण, सुंदरकांड पठण असे कार्यक्रम करत असू. मुले शनिवारी बालभारतीला जात असत. कॉलनी मध्ये नॉर्थ इंडियन लोकांबरोबर खेळलेली होळी पण लक्षात राहील. मी मुलांबरोबर क्रिकेट बॅडमिंटन खेळत असे. मुलांना चिल्ड्रेन पार्कला घेऊन जात असे. मुलांना खेळायला खूप मुले होती.
पण कॉलनी कितीही चांगली असली तरी घर जुने होते व फार सोयी नव्हत्या. त्यामुळे आम्ही एका वर्षात बाहेर घर घेतले व २९ मार्च २०२४ रोजी नवीन घरी शिफ्ट झालो.
नवीन घर ३ बेडरूमचे व खूपच छान होते. त्याच्या आठवणी पुढील लेखात..


No comments:
Post a Comment