कर्जतचे जुने घर म्हणजे अनेक आठवणींचा खजिना. घराचे नाव 'नंदादीप'.. काही आठवणी कर्जतच्या तर काही घराच्या...
मी 18 वर्षे या घरात राहिले. नंतर आम्ही मुंबईला राहायला आलो व घरही जुने झाल्याने तिथे नवीन इमारत बांधली. पण जुने घर अजूनही आठवते.
हे घर सहा खोल्यांचे होते. घराच्या भिंती दीड फूट जाड ... भिंतीत भरपूर कोनाडे. त्यामुळे सर्व सामान या कोनाड्यातच मावत असे. प्रत्येक खोलीला एक दार व एक खिडकी होती. सर्व दारे अंगणात उघडत असत.
त्यामुळे कुठूनही अंगणात जाता येत असे. घराच्या खोल्यांना आम्ही नावे दिली होती.जसे पुढची खोली, मधली खोली, सायकलची खोली, स्वयंपाकघर, बेडरूम, व सर्वात मागची किवा अडगळीची खोली. या खोलीत जायला भीती वाटत असे. कारण ती नेहमी बंद असल्याने त्यात एक जुना वास येत असे व त्या खोलीत बरेचदा पाली पण असत.
बेडरूममध्ये मोठा लाकडी बेड होता. डास खूप असल्याने कायम मछरदानी लावूनच झोपावे लागे. मछरदानीवर धूळ बसली कि अजिबात पंख्याची हवा लागत नसे. गर्मीने हैराण होत असे. मछरदानी धुतली कि त्यादिवशी मात्र भरपूर गार हवा. उन्हाळ्यात आम्ही कधी कधी चिडून मछरदानी काढून टाकत असू. त्या रात्री डास फोडून काढत मग दुसऱ्या दिवशी निमूट मछरदानी परत लावली जाई. मजा म्हणजे डास फक्त संध्याकाळी व रात्री चावत, दिवसा कधीच नाही. सातवी आठवीच्या सुट्टीत तर आम्ही सकाळी 10 वाजेपर्यंत लोळलो आहोत :)
स्वयंपाक घराची खिडकी मागच्या बाजूस होती. आमची अंगणातून खिडकीवर चढून आईला हात करत असू.
स्वयपाक घराला दोन खिडक्या होत्या त्यातून अंगण दिसत असे.
आम्हाला सर्वांना वाचनाची भयंकर आवड. मी तिसरीत असल्यापासून मराठी पेपर वाचू लागले होते. त्यातील अवघड शब्दांचा अर्थ मी आजोबाना विचारात असे. आई बाबा अनेक मासिके, पुस्तके आणत असत. आम्ही पुस्तके ठेवण्यासाठी मोठे लाकडी कपाट बनवून घेतले होते. आजोबांची मोठी धार्मिक पुस्तके दासबोध, ज्ञानेश्वरी वगैरे, science ची अनेक पुस्तके, गोष्टीची पुस्तके असत. मला लहानपणी बाबा जादूचा दिवा, वगैरे छोटी गोष्टीची पुस्तके आणत. मला त्यामुळे लहानपणापासूनच वाचनाची खूप आवड निर्माण झाली जी अजून कायम आहे. माझा वाचनाचा speed इतका वाढला की मी पुस्तकांचा फडशा पडू लागले. मी TV क्वचितच बघते.
मधल्या खोलीत दोन कॉट ठेवल्या होत्या. त्या लोलण्यासाठीच असत.आजोबा ओरडत कि उठा , लोळू नका.
पुढच्या खोलीत एक TV व दुसरा बेडरूम मध्ये असे.
घराभोवती मोठे अंगण होते. ते घराच्या दुप्पट आकाराचे. अंगणाभोवती कुंपण होते. अंगणात अनेक प्रकारची झाडे होती. फाटकावर मल्लिगे चा वेल होता. तो आईला तिच्या मैत्रिणीने दिला होता. तो वेल खूप छान बहरलेला असायचा. पावसाळ्यात तर असंख्य पांढऱ्या सुवासिक फुलांनी तो भरून जाई. त्याची फुले तोडून आम्ही वापरात असू. अंगण आधी मातीचे होते. आई ते रविवारी सारवत पण असे.. मग अंगणात फरश्या टाकल्या. त्यामुळे ते स्वच्छ वाटू लागले. अंगणातून घराभोवती पूर्ण फेरी मारता येत असे. अंगणात एक पांढऱ्या चाफ्याचे मोठे झाड होते. आम्ही लहानपणी त्या झाडावर चढत असू. तसेच त्याच्या शेजारी एक आंबा व अजून एक मोठे झाड, जे कसले होते हे आठवत नाही ही सुद्धा होती. ही झाडे छान सावली देत असत. आजोबांनी एक सुपारीचे झाड लावले होते. नंतर आंबा व दुसरे झाड तोडले. तिथे एक झोपाळा बसवला त्याला मोठा लाकडी पाट होता व वर लाल कौले होती. रात्री पूर्ण उगवलेला पौर्णिमेचा चंद्र अंगणातून खूप सुंदर दिसत असे. त्याच्याकडे बघत गार हवेत झोपल्यावर बसायला खूप मजा येत असे.
अंगणात मागच्या बाजूला लाल जास्वंदीची दोन मोठी झाडे, एक मोठे अनंताचे झाड, रुई, पळस, कण्हेर ही झाडे होती. एकेका झाडाला टोपली भरून फुले येत असत. ती आम्ही देवपूजेत वापरत असू. अळू सुद्धा होते, त्याची भाजी व वड्या रविवारी बनवत असू. घराच्या डाव्या बाजूच्या अंगणात गावठी गुलाबाचा वेल होता. तो पूर्ण भिंतीवर पसरला होता. त्याला गुलाबी सुवासिक फुले येत असत.पुढील अंगणात अगस्ती, बेल, तगर ही झाडे होती. पूर्वी घराभोवती सुद्धा वाफे होते. त्यात सर्व रंगांच्या गुलबक्षी होत्या. म्हणजे फिकट गुलाबी, गुलबक्षी, पिवळी, पांढरी वगैरे. गुलबक्षी चा वास मंद आणि गोड असतो. आई या फुलांची देठे एकत्र गुंफून वेण्या बनवत असे, त्यापण दोऱ्याशिवाय. मी सुद्धा वेणी बनवायचा प्रयत्न करत असे पण माझी वेणी आई इतकी छान कधीच बनत नसे.
अंगणात याशिवाय कृष्णकमळ, प्राजक्त, माका, अडुळसा, ब्राम्ही,पिवळा व पांढरा सोनटक्का, मोगरा, डाळिंब, कोरफड, हिरवी व साधी अबोली, पिवळी गुलाबी जांभळी कोरांटी, ब्रम्हकमळ, ice cream चे झाड(आम्ही दिलेले नाव, कारण याची फुले ice cream सारखी पांढरी शुभ्र दिसत), कुंद, निशिगंध, निळे व पांढरे गोकर्ण, दुर्वा, कर्दळ, जुई, चमेली चे तीन चार प्रकार,जाई, रातराणी, व इतर असंख्य झाडे होती जी आता आठवत नाहीत.
यामुळे लहानपणी आम्हा खूप झाडांची माहिती होती. आम्ही दारावर येणाऱ्या माणसाकडून झाडे विकत घेत असू तसेच गावात कुठेही कुठलेही झाड मिळाले कि आणून अंगणात लावत असू. मला झाडांची प्रचंड आवड आहे. भरपूर फुले गोळा करून देवाला वाहणे, गजरे करणे हेही आवडे. आम्ही फळझाडे मात्र लावू शकायचो नाही कारण मुले दगड मारत असत.
मी लहान असताना आई भोंडला करत असे. माझ्या मैत्रिणी मुक्ता, हेमंती, समोरची वैशाली मधुरा स्मिता सर्व मिळून फेर धरून भोंडला करत असू. मोठ्या अंगणात भोंडला होत असे.
उन्हाळ्याच्या सुट्टीतली दुपार म्हणजे मजाच मजा. आमच्या घराच्या डावीकडील बेडरूमच्या दाराबाहेर एक सिमेंटचा कट्टा बांधला होता. तिथे छान गार वाटत असे. त्यामुळे दुपारचे जेवण आणि time pass तिथेच होत असे.
अंगणातच एक मोरी बांधली होती. तिथे कपडे धुण्यासाठी एक दगड होता. मोरीच्या बाजूस मोठे औदुम्बराचे झाड होते. त्याचा बुंधा दोन्ही हातात मावत नसे इतके ते मोठे होते... या झाडामुळे मोरीत खूप गार वाटत असे. मोरीचा कट्टा हि अजून एक time pass करायची जागा होती. आमच्या मैत्रिणी व आम्ही तिथे खेळत असू.
घराच्या भिंतीना बाहेरून छोटे कोनाडे होते, त्यांना सुंदर देवळासारखा आकार होता. त्यात एक मारुतीची मूर्ती होती. या कोनाड्यात आम्ही दिवाळीला पणत्या लावत असू. अंगणात मोठ्या मोठ्या ठिपक्यांच्या रांगोळ्या काढत असू. आम्ही 25*25 ठिपक्यांच्या सुद्धा रांगोळ्या काढल्या आहेत. रोज एका फरशीवर रांगोळी अशा दिवाळी संपेपर्यंत 8 10 रांगोळ्या होत असत. अंगणात फुलबाज्या व झाडे लावत असू।
घराच्या अंगणात कधी साप निघत असत. बाबा त्यांना मारत असत. खेकडे तर खूप असायचे. ते अंगणात मोठी बिळे बनवायचे. आम्ही बिळात पाणी ओतायचो व ते कधी भरेल ह्याची वाट बघायचो. बागेत पिवळी फुलपाखरे येत असत. आम्ही ती पकडून कधी डबीत ठेवायचो व थोड्या वेळाने सोडून द्यायचो. त्यांच्या पंखांचा रंग बोटांना लागत असे. कधी एखादे मेलेले फुलपाखरू सापडायचे. त्याचे पंख आम्ही पुस्तकात जपून ठेवायचो.
कर्जत छोटे गाव असल्याने फिरायला जायला दोन तीनच ठिकाणे होती. आमचे आवडते ठिकाण म्हणजे टेकडी. टेकडीवर जायला दोन रस्ते आहेत. एक पायऱ्यांचा व एक चालायचा. आम्ही सायकल घेऊन टेकडीवर जात असू. वर जाताना खूप दम लागत असे. पण खाली येताना सायकल सोडली की ब्रेंकचा काही उपयोग होत नसे. ती प्रचंड वेगात खाली येत असे. वळणावर खूप भीती वाटत असे... पण मजा यायची. टेकडीवर देवीचे देऊळ, कचेरी, पाण्याची टाकी आहे. तिथून रेल्वे दिसते. पावसाळ्यात टेकडीवरून खूप सुंदर दृश्य दिसत असे.
दुसरी ठिकाणे म्हणजे कपालेश्वराचे देऊळ, दत्ताचे, मारुतीचे देऊळ, भिसेगावचे देवीचे देऊळ, highway वगैरे.






No comments:
Post a Comment